भूमिगत वाहिन्यांमुळे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी, शिडीगाड्यांची गरज कमी– महावितरणचा खुलासा

पुणे/पिंपरी, दि. 5 जुलै 2021: पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ओव्हरहेडच्या तुलनेत भूमिगत वाहिन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उपरी वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पूर्वीच्या तुलनेत शिडीगाड्यांची गरज कमी झाली आहे. सद्यस्थितीत उपरी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक उपविभागात आवश्यकतेनुसार शिडीगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर भूमिगत वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पॅनेलवरील कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

शिडीगाड्यांची (मेंटेनन्स वाहन) संख्या कमी केल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत असल्याने शिडीगाड्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महावितरणने स्पष्टीकरण दिले आहे. शिडीगाड्यांचा वापर मुख्यत्वे उपरी (ओव्हरहेड) वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात येतो. परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये राज्य व केंद्र शासन तसेच महावितरणच्या विविध योजनांमधील पायाभूत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण, सक्षमीकरणामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासोबतच महानगरपालिकांकडून देखील उपरी लघुदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरी भागात उपरी वीजवाहिन्यांच्या तुलनेत भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे.

तांत्रिक दुरुस्तीसाठी शिडीगाड्यांची आवश्यकता असणाऱ्या उपरी वाहिन्यांची संख्या कमी झालेली आहे. पर्यायाने तांत्रिक बिघाडांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी शिडीगाड्यांची कोणतीही गरज नाही. तसेच जनमित्रांना ग्राहकसेवा देण्यासाठी व दुरुस्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतंत्र वाहनभत्ता दिला जात आहे.

शहरी भागात विविध ठिकाणी सुरु असणाऱ्या खोदकामांमुळे भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या जातात. यासह फिडर पिलर, रिंगमेन युनिट, रोहित्र आदींमध्ये उपरी वाहिन्यांच्या तुलनेत विविध बाह्य कारणांमुळे बिघाड अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी शिडीगाड्यांची कोणतीही आवश्यकता नाही. सोबतच भूमिगत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडून अनेक कंत्राटदारांची पॅनेलद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त उपरी (ओव्हरहेड) वाहिन्यांसाठी आवश्यक असलेल्या शिडीगाड्यांची गरज पूर्वीच्या तुलनेत अत्यंत कमी झाल्यामुळे सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिडीगाड्यांची संख्या पुरेशी आहे व शिडीगाडीमुळे उपरी यंत्रणेच्या दुरुस्तीकामांमध्ये कोणताही विलंब होत नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.