November 5, 2025

पुणे: पुण्यात होणार नवी प्रभाग रचना, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जैसे थे’

पुणे, ४ जून २०२५: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोकळा झाला असून, त्यानुसार राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच कायम राहणार आहे.

राज्यात एकूण ९ महापालिकांमध्ये हद्दवाढ झालेली असून, या महापालिकांमध्ये प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार आहे. पुणे त्यामधील एक प्रमुख महापालिका आहे. दुसरीकडे, १७ महापालिकांची विद्यमान प्रभाग रचना ‘जैसे थे’ राहणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचना आणि निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम आखण्यास सुरुवात केली आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत आदेश जाहीर केले जाणार आहेत.

महायुती सरकारने याही निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे, जो २०१७ मध्येदेखील लागू करण्यात आला होता.

२०१७ नंतर अनेक महापालिकांच्या हद्दीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी दोन सदस्यीय प्रभाग प्रणाली लागू होती. त्यामुळे अशा ठिकाणी नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला गती दिली असून, स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे.