पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याला वाईमध्ये अटक

पुणे, 16 ऑक्टोबर 2022- कुख्यात गुंड गज्या मारणेला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने वाई ( सातारा ) परिसरातून रविवारी अटक केली. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने मारणे याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचा प्रकरणात मारणे होता फरार, नुकतीच त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे सर्व वरिष्ठ अधिकारी गजा मारणे याच्या कारवाईवर लक्ष्य ठेवून होते.
व्यवसायिकाचे मोटारीतून अपहरण करून २० कोटींची खंडणी मागणाऱ्या गुंड गजा उर्फ महाराज मारणे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे रा. हमराज चौक शास्त्रीनगर कोथरुड पुणे ( टोळी प्रमुख ) सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप वय ४३ रा धनकवडी , हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील वय ३९ रा. बुरली ता. पलुस जि. सांगली, अमर शिवाजी किर्यत वय ४६ रा. कोडोवली ता. जि. सातारा, फिरोज महम्मद शेख वय ५० रा. समर्थनगर कोडोवली ता. जि. सातारा, रुपेश कृष्णाराव मारणे. रा. नव एकता कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड, संतोष शेलार रा. कोथरुड, मोनिका अशोक पावर रा. दापोडी, अजय गोळे रा. नर्हे, मथुर जगदाळे रा. आंबेगाव पठार, मानसिंग ऊर्फ सुमत मोरे रा. सातारा, नितीन पौगारे रा. सातारा, प्रसाद खडागळे रा. तळजाई पठार सहकारनगर , नवणे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मारणे टोळीने परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी त्याच्या सांगण्यामुळे टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करून २० कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपीना अटक केली. टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव खंडणी विरोधक पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यावतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता. त्यानुसार टोळीविरुद्ध मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.