पुणे: ‘ऑफ ड्युटी’ अग्निशमन जवानाने केली लिफ्टमधे अडकलेल्या तरुणीची सुटका; नागरिकांकडून कौतुक

पुणे, २४ जून २०२१: – शहरातील मांजरी बुद्रुक येथील ऑक्सिजन वेलरी या सात मजली इमारतीमधील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यामध्ये अडकलेल्या तरुणीची ऑफ ड्युटी’ अग्निशमन जवानाने सुटका केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता घडली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन वेलरी या सात मजली इमारतीमध्ये मधे काही तांञिक कारणाने लिफ्ट बंद होऊन एक तरुणी त्या लिफ्टमध्ये अडकली होती. ही बाब तेथील वॉचमन व इतर रहिवाशांना समजताच आरडाओरडा सुरू झाला. त्याचवेळी तिथेच जवळ राहणारे अग्निशमन दलाचे जवान स्वप्निल टुले एका किराणा मालाच्या दुकानात सामान घ्यायला आले होते.
त्यांना ही घटना समजताच ते मदतीला धावले.

जवान टुले यांनी प्रथम त्या तरुणीला बोलून धीर दिला व लगेचच त्यांनी लिफ्ट रुमच्या दिशेने धाव घेतली व तेथून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अनुभवानूसार लिफ्ट कार्यरत केली. लिफ्ट कार्यरत होताच त्यांनी येऊन त्या लिफ्ट मधे अडकलेल्या तरुणीची सुखरुप सुटका केली.

जवान टुले यांनी दहाच मिनिटात केलेल्या कामगिरीचे तरुणीने व रहिवाशांनी आभार मानले व अग्निशमन दलाचे कौतुक केले.