September 10, 2025

Pune: विसर्जन मार्गावर दीड टन चप्पल आणि बूटाचा खच

पुणे, ८ सप्टेंबर २०२५: शहरात गणेश विसर्जन मिरवणूकीनंतर शहरातील मिरवणूक मार्गांवर तब्बल दीड टन चप्पल आणि बूटांचा कचरा उलचण्य़ात आला आहे. या शिवाय, यंदा अनेक मंडळांकडून खेळण्यातल्या नोटा पेपर ब्लास्ट मधून उडवण्यात आला असून त्याचा खच रस्त्यांवर पडला आहे.

तर, महापालिका प्रशासनाकडून मिरवणूक मार्गावर करण्यात आलेल्या स्वच्छतेत शहरातून तब्बल ७०६ टन कचरा संकलीत करण्यात आला आहे. महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक संपताच शहरात तीन हजार कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात करण्यात आले होते. त्यातील १५०० कर्मचारी रात्री दोन पर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य विसर्जन मार्गावरील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्यावर स्वच्छता करण्यात आली तर सोमवारी दिवसभरात मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये स्वच्छता करण्य़ात आली.

मागील चोवीस तासांपासून हे स्वच्छतेचे काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे कचरा संकलनात अडथळा येत असून अनेक मंडळांकडून कचऱ्यात देखाव्याचे साहित्य, थर्माकाॅल तसेच फुले रस्त्यावर जागा मिळेल तिथे अस्ताव्यस्त टाकले असल्याने कचरा संकलनात अडथळे येत आहेत.

मिरवणूक मार्गावरील कचरा स्थिती
– ओला कचरा – ४२० टन
– सुका कचरा – २८६ टन
– डेकोरेशन साहित्य – ३० टन
– चप्पल- बूट – १ टन ६०७ किलो