पुणे: उच्चभ्रु तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने एकाला १८ लाखांचा गंडा

पुणे, ०७/०७/२०२२: तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून एकाला चोरट्यांनी १८ लाख ३७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकाने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार एका खासगी कंपनीत अधिकारी आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर रिना नावाच्या एका महिलेने संपर्क साधला. एका संकेस्थळाच्या माध्यमातून उच्चभ्रु तरुणींशी मैत्री करुन दिली जाते. त्यासाठी नावनोंदणी करावी लागेल, अशी बतावणी रिना नावाच्या महिलेने त्यांच्याकडे केली. रिनाने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही तरुणींची छायाचित्रे पाठविली. त्यानंतर तक्रारदार आमिषाला बळी पडले.

तक्रारदाराकडे वेळोवेळी बतावणी करुन त्यांच्याकडून १८ लाख ३७ हजार ६०० रुपये उकळण्यात आले. तक्रारदाराने रिना नाव सांगणाऱ्या महिलेकडे विचारणा केली. तेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे फिर्याद दिली. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन तक्रारदाराशी संपर्क साधून आमिष दाखविण्या आल्याचे उघडकीस आले असून गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.