पुणे: महापालिकेच्या इमारतीला केवळ एक रुपया भाडे, वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीचा निर्णय

पुणे, २२/०८/२०२१: एकीकडे महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी ॲमेनिटी स्पेसची जागा ३० वर्ष भाड्याने देण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कर्वेनगर येथे शाळेची इमारत सामाजिक संस्थेला अभ्यासिका चालविण्यासाठी वर्षाला केवळ एक रुपये भाडे घेतले जाणार आहे.

वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करून शाळा बांधली असताना तेथील जागा खासगी संस्थेला दिली जात असल्याने हा ठराव रद्द करा अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

कर्वेनगर मध्ये प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेच्या ताब्यात आली. त्यानंतर तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून महापालिकेने तिथे शाळेचे बांधकाम केले आहे. या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळालेले नसून, शाळा सुरु ही झालेली नाही. असे असताना या शाळेचा हॉल पाच वर्षांसाठी सामाजिक संस्थेला वार्षिक एक रुपया भाड्याने देण्याचा निर्णय प्रभाग समितीने घेतला आहे. हा ठराव महापालिकेचे नुकसान करणारा असल्याने तो रद्द करावा अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

प्रभाग समितीच्या अध्यक्षा वृषाली चौधरी म्हणाल्या, ‘‘हा ठराव प्रभाग समितीने मंजूर केला असला तरी अद्याप त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही. शाळेतील एक खोली एक रुपया भाड्याने देत आहोत. त्याबदल्यात प्रभागातील विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेद्वारे मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.