पुणे, २५ डिसेंबर २०२५: पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या दोन्ही गटांची संभाव्य आघाडी चर्चेत असतानाच बाणेर–बालेवाडी परिसरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे वर्चस्व असलेल्या या भागात शरद पवार गटाकडून जयेश मुरकुटे यांनी उमेदवारीसाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या असून त्यांनी थेट शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक येथे भेट घेतली आहे.
कोथरूड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या जयेश मुरकुटे यांनी या भेटीनंतर सोशल मीडियावर “कड्यांस माझ्या उंचीचा अंदाज नसावा, कोसळताना नभास घेऊन कोसळलो मी…” अशी सूचक आणि राजकीय अर्थपूर्ण पोस्ट करत विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
मुरकुटे यांच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण–सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरात तरुण, उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व पुढे येत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांच्या पाठीशी ठाम पाठबळ दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रभागातील नागरी समस्या, आयटी कर्मचारी व उच्चशिक्षित नागरिकांच्या प्रश्नांवर मुद्देसूद मांडणी करत मुरकुटे यांनी जनतेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या परिसरात स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू आणि तरुण चेहरा म्हणून जयेश मुरकुटे हे आता ठोस पर्याय ठरत असून, त्यांच्या हालचालींमुळे बाणेर–बालेवाडीतील राजकारण तापल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

More Stories
“मी गुपचूप कुठेही गेलो नाही!” – प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादीला ठाम रामराम
जगतापांचा राजीनामा पण दोन्ही राष्ट्रवादीसह मविआची बैठक संपन्न
पुणे पर्यटनाला नवी चालना; पीएमपीएमएलच्या मार्ग क्रमांक ६ व ७ मध्ये नव्या स्थळांचा समावेश