पुणे, ६ नोव्हेंबर २०२४: पुणे शहरातील गेल्या ५७ वर्षातील विधानसभा निवडणुकांचा इतिहास तपासला, तर बंडखोरांनी निकालावर परिणाम केला. परंतु पुणेकरांनी बंडखोरांना कायम ठेंगा दाखविला आहे, त्यामुळे एकही बंडखोर पुण्यातून निवडून आलेला नाही. मतदारांनी कायमच पक्षाच्या बाजूने कौल दिला.
पुणे शहरासह जिल्हयात सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. शिवाजीनगर मतदार संघातून काँग्रेसचे मनीष आनंद पर्वती मधून आबा बागुल भरत सुराणा हडपसर मधून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गंगाधर मध्ये खडक असल्यामुळे काँग्रेसचे राहुल मते यांनी बंडखोरी केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील बंडखोरी झाली आहे.
१९६७ पासून आजपर्यंत पुणे शहरात एकाही बंडखोर विजयी झाला नाही. मात्र या बंडखोरांनी पक्षाला अडचणीत आणल्याचे अनेक उदाहरणे पाहावयास मिळाली आहेत.
पुणे शहरात यापूर्वी बोपोडी, शिवाजीनगर, पर्वती, कसबा, भवानी पेठ आणि पुणे कॅन्टोमेंन्ट हे सहा विधानसभा मतदार संघ होते. २००९ मध्ये मतदार संघांची फेररचना झाली आणि शहरात दोन नवीन विधानसभा मतदार संघाची भर पडून आठ विधानसभा मतदार संघ झाले. या फेररचनेत बोपोडी आणि भवानी पेठ विधानसभा मतदार संघ संपुष्टात आले. तर खडकवासला आणि वडगावशेरी हे दोन नवीन मतदार संघ उदयास आले. शिवाजीनगर विधानसभेचे दोन तुकडे होऊन कोथरूड हा नव्याने मतदार संघ अस्तित्वात आला. तर भवानी पेठ विधानसभा मतदार संघाचा काही भाग हा पर्वती आणि कसबा मतदार संघात समाविष्ट झाला.
अल्पशा भाग पुणे कॅन्टोमेंन्ट विधानसभा मतदार संघाशी जोडला गेला. तर पुणे कॅन्टोमेंन्टचा काही भाग तोडून हडपसर विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आला. यापूर्वी पर्वती विधानसभा मतदार संघ आरक्षित होता. फेररचनेत पुणे कॅन्टोमेंन्ट विधानसभा मतदार संघ आरक्षित झाला. तर बोपोडी विधानसभा मतदार संघाचा काही भाग शिवाजीनगर आणि कोथरूड मध्ये समाविष्ट झाला. मुळशीचा शहराशी जोडलेल्या काही भागाचा खडकवासला आणि पूर्व हवेलीच्या काही भाग वगळून वडगाव शेरी हे दोन मतदार संघ नव्याने अस्तित्वात आले.
पूर्वीच्या सहा विधानसभा मतदार संघातील १९९६७ पासून १९९९ पर्यंतचा इतिहास तपासला, तर बहुतांश वेळा प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सरळ लढत झाल्याचे पाहावयास मिळते. मात्र १९९९ मध्ये कॉंग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली. रिंगणातील उमेदवारांची संख्या वाढली आणि मतविभागणीचा निकालावर झालेला परिणाम झाल्याचे दिसून येते. परंतु अपवादात्मक उदाहरणे वगळता त्यावेळी तालेवार नेत्यांच्या बंडखोरीचे प्रमाण नगण्य होते. १९९५ मधील युतीची लाट वगळता १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसमुळे शिवाजीनगर मध्ये शिवसेनेला संधी मिळाली. तर १९९८० पासून १९९५ पर्यंत कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या पर्वती विधानसभा मतदार संघात मात्र १९९९ मध्ये कॉंग्रेसमधील बंडखोरीच्या मदतीने भाजपचे कमळ फुलले. या उलट त्याच निवडणुकीत मात्र विभाजन होऊनही बोपोडी मतदार संघ कॉंग्रेसकडे कायम राहिला.
२००९ मध्ये शहरातील मतदार संघाची फेररचना झाली. सहाचे आठ विधानसभा मतदार संघ झाले. त्यानंतरच्या काळात वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाली, परंतु पुणेकरांनी या बंडखोरांच्या बाजूने कधीही कौल दिला नाही. त्यामुळे शहराचा इतिहास तपासला तर बंडखोरांना कायमच अपयश आल्याचे दिसून आले आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.