पुणे, ८ जुलै २०२२ ः पुणे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गा लगत बिनधास्तपणे कचरा आणि राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कात्रजपासून ते बाणेर-बालेवाडीपर्यंत या मार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. आता हे प्रकार रोखण्यासाठी पुणे महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुढाकार घेतला असून, कारवाईसाठी भरारी पथक तयार केले आहे.
यामहामार्गावरील कचरा व राडारोडा टाकण्याचे बंद झाले पाहिजे यासाठी आज (ता. ८) महापालिका आणि एनएचएआय यांची संयुक्त बैठक महापालिकेत झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार एनएचएआयचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा कदम, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे, आदर पुनावाला सिटी क्लिनलीनेस इनिशिएटिव्हचे मल्हार करवंदे आदी उपस्थित होते.
मुंबई, कोकण, सातारा याभागातून येणारे नागरिक कात्रज देहूरस्ता बाह्यवळण महामार्गावरून पुण्यात प्रवेश करतात. पण शहरात प्रवेश करताना कात्रजचा घाट असो की नवा बोगदा या दोन्ही रस्त्याच्या कडेने कचरा आणून टाकला जात आहे. तसेच ट्रक, टेम्पोमधून राडारोडा आणून टाकला जात असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यावर प्रतिबंध करावा असे पत्र यापूर्वी एनएचएआयने महापालिकेला दिले होते. पण संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीला वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड, धनकवडी-सहकारनगर आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले होते.
दिवसभरात महापालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवतात त्यामुळे कचरा टाकला जात नाही, पण रात्रीच्या वेळी कचरा व राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी कारवाईसाठी पथक तयार केले जाणार आहे. त्यामध्ये पालिकेकडून आरोग्य निरीक्षक असणार आहे, तर बाकीची यंत्रणा एनएनचएआयकडून दिली जाणार आहे.रात्री कचरा टाकणाऱ्याला १८० रुपये दंड आहे. तर राडारोडा टाकणाऱ्यास प्रति ट्रक २५ हजाराचा दंड आहे. जर राडारोडा कमी असेल तर प्रतिटन १२५० रुपयांचा दंड लावला जाईल, असे आशा राऊत यांनी सांगितले.
More Stories
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे