पुणे: महापालिकेतील शिक्षण विभागातील सहायक प्रशासकीय अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना पकडले

पुणे, दि. १६ जुलै २०२१:- शालेय शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश यादीत तक्रारदार महिलेच्या मुलीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, त्याबाबतची कागदपत्रे तपासून मान्यता देण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण विभागातील सहायक प्रशासकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे. त्यामुळे प्रंचड खळबळ उडाली आहे.

सहायक प्रशासकीय अधिकारी शिवाजी बबन बोखारे (वय ५०) यांच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेच्या मुलीचे शिक्षण हक्क कायद्यातंर्गत बाणेरमधील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये लॉटरी पद्धतीने नाव समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, त्याबाबतची कागदपत्रे तपासून प्रवेशाला मान्यता देण्यासाठी बोखारे यांनी तक्रारदार महिलेकडे ५० हजारांची मागणी केली होती. त्यानुसार महिलेने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर पथकाने सापळा रचून बोखारे याला लाच घेताना पकडले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या पथकाने केली.