महापालिका आवारात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

पुणे, ६ जुलै २०२१ : पुणे महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांनी मोगलांशी लढा देऊन स्वराज्य स्थापन करीत देश अखंड ठेवला. स्वाभिमान, सुप्रशासन, शिस्त, अचूक निर्णय क्षमता, मुत्सद्दीपणा, धाडसीपणा, पराक्रम, प्रामाणिकपणा, महिलांचा आदर असे सर्वच गुण आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. धर्मनिरपेक्षता जपणारा, रयतेच्या हितासाठी राज्य करणारा राजा अशी शिवाजी महाराजांची ओळख आहे. सर्वांसाठी प्रेरणास्थान असणार्या शिवरायांचा पुतळा नवीन इमारतीच्या दर्शनीय जागेत बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष बाब म्हणून वर्गीकरण करण्यात येणार आहे. नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी या संदर्भात स्थायी समितीला पत्र दिले होते.