पथारी व्यावसायिकांचे लॉकडाउनमधील शुल्क होणार माफ

पुणे, 9/11/2021 – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील लॉकडाउन काळातील पथारी व्यावसायिकांचे भाडे शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय आज स्थायी समितीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने पुढे म्हणाले, ‘गेल्या आर्थिक वर्षातील लॉकडाउनमुळे पथारी व्यावसायिकांचे भाडे आणि दंड माफ करण्यात यावा असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे चर्चेला आला होता. त्यानुसार भाड्याच्या रकमेपोटी १६ कोटी २ लाख रुपये आणि या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत दंडापोटी ३ कोटी ७४ लाख रुपये असे एकूण १९ कोटी ७६ लाख रुपये माफ करावे लागत होते.’

रासने म्हणाले, ‘या प्रस्तावावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या काळात व्यवसाय करायला परवानगी देण्यात आली होती तो काळ वगळून उर्वरित काळासाठीचे भाडे शुल्क आणि दंड माफ करावा असा निर्णय करण्यात आला. त्यानुसार कोरोना काळात बिल बजावू न शकल्याने आगाऊ शुल्क न भरलेल्या एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठीचे शुल्क ८ कोटी ३२ लाख रुपये आणि दंड ३ कोटी ६८ लाख रुपये असे १२ कोटी एक लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे हातावर पोट असणार्या आणि कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या पथारी व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.’