पुणे, ०५/०८/२०२५: पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून “फिरते पास केंद्र” ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मासिक प्रवास पास सुविधा आता थेट त्यांच्या परिसरात उपलब्ध होणार आहे. “फिरते पास केंद्र” या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.
“फिरते पास केंद्र” उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
१. सेवा क्षेत्र – फिरते पास केंद्र सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या ग्रामीण हद्दीतील ६ ठिकाणी सोमवार ते शनिवार दरम्यान कार्यरत राहील.
२. प्रवाशांसाठी सुविधा –
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी मासिक पास काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महापालिकेच्या अनुदानित पास योजनांविषयीची माहितीही याठिकाणी दिली जाणार आहे.
३. देयक पद्धती – रोख रक्कम, क्यू आर कोड आणि पी.ओ.एस. मशीनद्वारे पास शुल्क स्वीकारले जाणार आहे.
४. महामंडळाच्या विविध योजना माहितीचे प्रबोधन – प्रवाशांना पीएमपीएमएल च्या उपक्रमांविषयी माहिती दिली जाणार आहे: पुणे दर्शन, पुणे पर्यटन बस सेवा, आपली पीएमपीएमएल मोबाईल अॅप, महिला विशेष बस सेवा, रातराणी बस सेवा.
५. नागरिक व विद्यार्थ्यांची सोय तसेच उत्पन्नवाढीचा हेतू – फिरते पास केंद्राच्या माध्यमातून नागरिक व विद्यार्थ्यांची सोय करणे तसेच महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
६. साप्ताहिक वेळापत्रक व ठिकाणे (सोमवार ते शनिवार वेळ – सकाळी ७.३० ते १.३०):
दिवस – ठिकाण
सोमवार एस. एन. डी. टी. कॉलेज (मेट्रो स्टेशन)
मंगळवार कोंढवा गेट (एन. डी. ए. गेट सर्कल)
बुधवार खडी मशिन चौक (के. जे. व जे. के. कॉलेज)
गुरुवार राधा चौक (बाणेर – बालेवाडी)
शुक्रवार हिंजवडी गाव (शिवाजी चौक)
शनिवार आकुर्डी रेल्वे स्टेशन
या उपक्रमाद्वारे पीएमपीएमएलच्या सेवा अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचणार असून भविष्यात उत्पन्नवाढीच्या व प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने इतर भागांतही फिरते पास केंद्र सुरु करण्याचा मानस आहे.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर