पीएमपीएमएल कडून मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन नवीन बसमार्ग सुरू

पुणे, १३/०७/२०२१: पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ११अ  मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन हा नवीन बसमार्ग आज दि. १३ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आला. तसेच मार्ग क्र. १४८ अ भोसरी ते भेकराईनगर या मार्गात बदल करून ही बससेवा देखील मार्गे कासारवाडी रेल्वे स्टेशन आजपासून सुरू करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका व स्थायी समिती सदस्या मा.सौ.आशाताई धायगुडे शेंडगे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

 

यावेळी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, समन्वयक अधिकारी तथा पिंपरी आगार व्यवस्थापक संतोष माने, भोसरी आगार व्यवस्थापक  रमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते  संजय शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

मार्ग क्रमांक ११अ  मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन या बससेवेचा मार्ग मार्केट यार्ड-स्वारगेट-अप्पा बळवंत चौक-मनपा-शिवाजीनगर-मुळा रोड-खडकी बाजार-बोपोडी-दापोडी-पिंपळे गुरव-सृष्टी चौक-कासारवाडी रेल्वे स्टेशन असा असणार आहे.  तसेच मार्ग क्र. १४८ अ भोसरी ते भेकराईनगर या बससेवेच्या मार्गात बदल करून ही बससेवा आजपासून भोसरी-लांडेवाडी-एमआयडीसी-भोसरी पोलीस चौकी-नाशिक फाटा-कासारवाडी रेल्वे स्टेशन-सृष्टी चौक-पिंपळे गुरव-दापोडी-बोपोडी-खडकी बाजार-सादलबाबा-येरवडा-बंड गार्डन-पुणे स्टेशन-वेस्ट एंड-पुल गेट-फातिमानगर-वैदूवाडी-मगरपट्टा कॉर्नर-हडपसर-एनआयबीएम-भेकराईनगर या मार्गाने जाईल.

 

मार्ग क्रमांक ११अ  मार्केट यार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन हि बससेवा सध्या दर सव्वा तासाने उपलब्ध आहे. तर  मार्ग क्र. १४८ अ भोसरी ते भेकराईनगर ही बससेवा दर ४० मिनिटांनी उपलब्ध आहे. प्रवाशी प्रतिसादानुसार या मार्गावर आणखी बसेस वाढवण्यात येतील.

 

याप्रसंगी बोलताना नगरसेविका सौ. आशाताई धायगुडे-शेंडगे म्हणाल्या, “कासारवाडी येथून पीएमपीएमएलने बससेवा सुरू केल्याने विशेषतः महिला वर्गाची चांगली सोय होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची आमची मागणी  पूर्ण होत असल्याने विशेष आनंद होत आहे.”

 

पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रय झेंडे म्हणाले, “पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांनी पीएमपीएमएल ला कोरोना काळातही कोणतीही आर्थिक अडचण भासू दिली नाही. त्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले. आज सुरू झालेल्या या बससेवेसाठी नगरसेविका सौ. आशाताई धायगुडे-शेंडगे यांनी विशेष पाठपुरावा केला. जास्तीत जास्त नागरिकांनी या नवीन बससेवेचा लाभ घ्यावा.”