पुणे: ‘पीएमपीएमएल’ ची सिंहगडावरील ई-बस सेवा दि. १७ मे २०२२ पासून तात्पुरत्या कालावधीकरिता स्थगित

पुणे, १६/०५/२०२२: वाहनांच्या गर्दीमुळे किल्ले सिंहगडावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने दि. ०१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते सिंहगड किल्ल्याकरिता ई-बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.

 

दि. ०२ मे २०२२ पासून प्रायोगिक तत्वावर सिंहगडावर खाजगी वाहने बंद करून ई-बस सेवा चालू करण्यात आली. या करिता सिंहगड वाहनतळावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले हाते, या बस सेवेला पर्यटकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उपलब्ध असलेल्या सर्व ई-बसेस या मार्गावर धावल्या. परंतु प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता उपलब्ध असलेल्या ई-बसेसची संख्या अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे.

 

दि. ०२ मे २०२२ पासून प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या ई-बस सेवेच्या मार्गक्रमनात अरूंद रस्ते, जागेवरचे अवघड वळण, चढता घाट, तीव्र उतार यामध्ये बसेसचे चार्जिंग मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. त्यामुळे बसेसची संख्या व चार्जिंग पॉईंटची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याची डागडुजी व काही ठिकाणी रूंदीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून पर्यटकांचा प्रवास सुखदायक होईल.

 

ई-बसेस सेवा चालू झाल्यापासून झालेला किरकोळ अपघात व इतर अडथळयांचा विचार करता या मार्गावर नवीन लहान आकाराच्या ई-बसेसची आवश्यकता असून तसेच रस्त्याची दुरूस्ती होणे देखील आवश्यक आहे त्याकरिता लागणारा वेळ लक्षात घेता या मार्गावरील ई-बस सेवा दि. १७ मे २०२२ पासून तात्पुरत्या कालावधीकरिता स्थगित करून नवीन बस आवश्यक संख्येत उपलब्ध झालेनंतर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पर्यटकांनी वनविभाग व पीएमपीएमएल पुणे यांना या कालावधीत केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही पर्यटकांचे आभारी आहोत.