September 11, 2025

पुणे : पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवा क्र. ११ चा शुभारंभ; पहिल्याच दिवशी तीन बसेस मार्गस्थ

पुणे, १८ जुलै २०२५: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) पर्यटन बससेवेचा विस्तार होत असतानाच, पर्यटन बससेवा क्र. ११ चा भव्य शुभारंभ स्वारगेट बसस्थानक येथून करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सकाळी ८:३० वाजता हिरवा झेंडा दाखवून या सेवेला प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे, कामगार व जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर शैलेश जगताप, सांख्यिकी अधिकारी राजेश बुनगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या नव्या मार्गासाठी पहिल्याच दिवशी एकूण तीन बसेस मार्गस्थ करण्यात आल्या असून, एकूण ९९ पर्यटकांनी या सेवेसाठी बुकिंग केले होते. यामध्ये महिला पर्यटकांची संख्या विशेष उल्लेखनीय होती.

शुभारंभ प्रसंगी बोलताना मुधोळ-मुंडे म्हणाल्या, “पीएमपीएमएलच्या पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित पर्यटन बससेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. विशेषतः महिला पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय असून ही सेवा किफायतशीर दरात उपलब्ध केल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.”

पर्यटन बससेवा क्र. ११ चा मार्ग: स्वारगेट – डेक्कन जिमखाना – एकविरा देवी मंदिर / कार्ला लेणी – लोणावळा रेल्वे स्टेशन (येथे बस पार्किंग केल्यानंतर पर्यटकांना स्वतःच्या खर्चाने भुशी धरण, मनशक्ती ध्यान केंद्र, व्हॅक्स म्युझियम व अन्य स्थळांना भेट देता येईल) – स्वारगेट.

महत्त्वाच्या सूचना व माहिती:
– बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप बुकिंग केल्यास ५ प्रवाशांचे तिकीट मोफत.
– सर्व पर्यटन मार्गासाठी प्रति व्यक्ती तिकीटदर ₹५००/- इतका आहे.
– तिकीट बुकिंगसाठी खालील पास केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहे – डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, निगडी, भोसरी बसस्थानक.
– यापूर्वी ही सेवा केवळ शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी उपलब्ध होती, परंतु आता आवश्यक तेवढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे सातही दिवस ही सेवा चालू राहणार आहे.
– पर्यटकांचा प्रतिसाद कमी असल्यास किंवा अन्य कारणास्तव सेवा रद्द झाल्यास पर्यटकांना इतर दिवशी प्रवास करता येईल.
– सेवा सुरु होण्याच्या दिवशी प्रवाशांना त्यांच्या घरापासून बसच्या स्थानापर्यंत आणि सायंकाळी पुन्हा घरापर्यंत इतर पीएमपीएमएल बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
– प्रत्येक बसमध्ये पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी गाईड सेवक उपलब्ध असतील.

अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी समन्वयक सेवक श्री. नितीन गुरव (मोबाईल क्र. ९८५०५०१८६२) यांच्याशी संपर्क साधावा. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांजवळील धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष बससेवा नागरिकांसाठी एक नवा प्रवास अनुभव देणार आहे.