बारामती लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी १३.३ कोटींचा निधी मंजूर

पुणे, दि.१ ऑगस्ट, २०२१: ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामासाठी विशेष अनुदान’ योजनेअंतर्गत जेजुरी आणि भोर नगर परिषदेस राज्याच्या नगरविकास विभागाकडून ३ कोटी ५० लाख आणि दीड कोटी इतका निधी मिळाला आहे. तर पीएमारडीए कडून आठ कोटी तीस लाखाहून अधिक असा सुमारे १३ कोटी ३ लाख इतका निधी मिळाला आहे.

यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे विशेष आभार मानले आहे. या निधीतून जेजुरी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तर भोर शहरात विविध विकास कामे करता येणार आहेत. प्राप्त निधीमधून जेजुरी मध्ये जलवाहिन्या बसविण्यात येणार आहेत. नलिका टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी मल्हार सागर धरण येथे ७५ एचपीची मोटार बसविण्यात येणार आहे. याबरोबरच शहरातील मलनिस्सारण आणि रस्त्याची कामे पुर्ण करण्यात येणार असून शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण देखील करण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अशा रीतीने जेजुरी शहरातील पाणी, विविध चौकांचे सुशोभीकरण आणि मलनिस्सारण आदी कामे मार्गी लागण्यास मदत झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे खास आभार मानले आहेत. जेजुरीबरोबरच भोर नगरपरिषदेसाठी याच योजनेतून एक कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीच्या माध्यमातून भोर शहरात विविध विकासकामे करता येणे शक्य होणार आहे.

याशिवाय बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, दौंड आणि हवेली या तालुक्यांतील पीएमआरडीए च्या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या रस्त्यांसाठी प्राधिकरणाने सुमारे ८ कोटी ३० लाखांहून अधिक निधी मंजूर केला आहे. याबद्दल पीएमआरडीएचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

अंतर्गत रस्त्यांसाठी ‘पीएमआरडीए’ कडून मिळालेला निधी आणि कामाचे स्वरूप असे
*राज्य मार्ग. ११९ ते सुपे खुर्द (पुरंदर)– ७० लाख
*एन एच ४ ते वरवे बुद्रुक ते कांजळे रस्ता व पुल (भोर) ५० लाख
*राज्य मार्ग १०६ ते निधान सांगवी रस्ता (भोर) ४० लाख
*राज्य मार्ग १०६ ते अस्कवडी रस्ता (वेल्हा) २५ लाख
*राज्य मार्ग १०६ ते लाशीरगाव रस्ता (वेल्हा) २५ लाख
*प्र. राज्य मार्ग ५ ते मुख्य रस्ता ते ग्रामीण मार्ग क्र. २० माले दत्तवाडी (मुळशी) १२५ लाख
*भुकुम मुख्य रस्ता ते आंग्रेवाडी जोडरस्ता (मुळशी) ६१ लाख
*वरवंड २६ फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग ६५ ते धोंड दादा दिवेकर वस्ती (दौंड) १०१.२५ लाख
*वरवंड २६ फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग ६५ ते शेरीचा मळा रस्ता (दौंड) १०८ लाख
*गोगलवाडी ते चोराचा माळ ते वेळू रस्ता (हवेली) ८२.५० लाख
*मांडवी खुर्द ते गोगलवाडी रस्ता (हवेली) ६० लाख
*अहिरे ग्रामीण मार्ग ४०४ ते सोनारवाडी जोड रस्ता (हवेली) ८२.५० लाख.