पुणे, 20/09/2025: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १९ सेवा सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहे. नागरिकांना शासकीय सेवा / कामे घरबसल्या ऑनलाईन करता यावी, यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून संबंधित सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. आठवड्याभरात यात १० नवीन सेवांची भर पडणार असून नागरिकांना पीएमआरडीएमधील एकूण २९ सेवांचा लाभ ऑनलाईन घेता येणार आहे.
शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने १५० दिवसाच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा सुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून १९ सेवा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या सेवा सुविधांचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन प्रणालीत अर्जदार नागरिकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश मिळणार आहे. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. संबंधितांना आपला अर्ज/ फाईल कुठल्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर कार्यवाहीसाठी आहे, याची माहिती अर्जामध्ये नमूद केलेल्या क्रमांकावर या सुरू केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे.
पीएमआरडीएतील या सेवा ऑनलाईन उपलब्ध
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमधील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून १९ सेवा सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
विकास परवानगी विभाग
१. अभिन्यास/इमारत बांधकाम परवानगी
२. जोता मोजणी प्रमाणपत्र
३. भोगवटा प्रमाणपत्र
४. झोन दाखला
५. भाग नकाशा/नकाशा देणे
६. सुधारित बांधकाम परवानगी
७. तात्पुरते रेखांकन परवानगी
८. सुधारित तात्पुरते रेखांकन
९. अंतिम रेखांकन परवानगी
१०. नूतनीकरण परवानगी
११. भागश: भोगवटा प्रमाणपत्र
१२. साईट एलेवेशन प्रमाणपत्र
जमीन व मालमत्ता विभाग
१. वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तातंरण
२. वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर वारसानोंद
३. वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर कर्जासाठी ना- हरकत प्रमाणपत्र
अग्निशमन विभाग
१. प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखला
२. अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला
३. पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र
४. अग्निशमन बंदोबस्त
या सेवा नागरिकांसाठी आपले सरकार या https://aaplesarkar.mahaonline.gov.in तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. संबंधित १९ सेवांसाठी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी येत असल्यास संबंधितांनी त्या-त्या विभागास भेट दिल्यानंतर त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
More Stories
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?
Pune: एकीकडे खड्डेमुक्तीचा दावा; दुसरीकडे ५५० किमीची खोदाई