September 12, 2025

पुणे: पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज

पुणे, २७ मे २०२५: आगामी पावसाळा आणि संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज झाला आहे. आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून नागरीकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर पडू नये तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून पावसाच्या हलक्‍याशा ते मुसळधार स्वरुपाच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. त्यास अनुसरून पीएमआरडीएने आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. प्राधिकरणाचे प्रभारी महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क राहून मदतकार्य वेळेत पोहोचविण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत वेळेवर मदत पोहोचावी यासाठी पीएमआरडीएच्या यंत्रणा तसेच स्थानिक अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्याशी समन्वय ठेवण्यावर भर दिला जात आहे. तसेच नागरिकांनी पर्यटन अथवा अनावश्यक कारणासाठी घराबाहेर न पडता शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आपत्कालीन मदतीसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक :
– पुणे आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF): 9545282930
– मारुंजी अग्निशमन विभाग: 020-67992101 / 020-67992100 / 7066055101
– नांदेड सिटी अग्निशमन विभाग: 020-67520002 / 020-67520001
– वाघोली अग्निशमन विभाग: 020-29518101 / 020-29519101

नागरिकांनी या क्रमांकांवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधावा आणि सुरक्षित राहावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.