पुणे: विसर्जन मिरवणुकीतील रथांची उंची कमी ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे, २८/०८/२०२२: वैभवशाली परंपरा असलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीतील भव्य रथांची उंची कमी ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी पूलामार्गे (लकडी) पूल विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांनी रथांची कमाल उंची १८ फुट तसेच कर्वे रस्त्याने (गरवारे मेट्रो स्थानक) जाणाऱ्या मंडळांनी रथांची उंची १६ फुट ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

यंदा विसर्जन मिरवणूक ९ सप्टेंबर रोजी आहे. लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेली मंडळे लोकमान्य टिळक चौकातून छत्रपती संभाजी पुलावरुन खंडुजीबाबा चौकातून विसर्जन घाटाकडे जातात. कर्वे रस्त्यावरुन येणारी मंडळे खंडुजीबाबा चौकमार्गे विसर्जन घाटाकडे जातात. खंडुजीबाबा चौकात नव्याने निर्माण झालेल्या मेट्रो पुलाची उंची २१ फुट आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरुन खंडुजीबाबा चौकाकडे येणाऱ्या मंडळांनी विसर्जन रथाची उंची १८ फुटापर्यंत ठेवावी. कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानकाची उंची १८ फुट आहे. नळस्टाॅप कर्वे रस्त्यावरील मेट्रो पुलाची उंची १७ फुट आहे. कर्वे रस्त्यावरुन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी विसर्जन रथाची उंची देखाव्यासह १६ फुट ठेवावी. कर्वे रस्त्यावर सेवा रस्त्याची रुंदी १५ फुट असल्याने रथांची कमाल रुंदी १२ फुट ठेवावी, असे आवाहन डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी केले आहे.

 

 

कर्वे रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकसमाेर असलेल्या पदपथावर झाडांच्या फांद्या सेवा रस्त्यावरुन १२ फुट उंचीपर्यंत तिरऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा होऊ शकतो, असे पोलीस निरीक्षक करपे यांनी सांगितले.

 

 

ठिकाण उंचीची मर्यादा

 

छत्रपती संभाजी पुल (लकडी पुल) मेट्राे ओव्हर ब्रीज उंची २१ फुट

 

गरवारे मेट्रो स्थानक (कर्वे रस्ता) मेट्रो ओव्हर ब्रीज उंची १८ फुट

 

नळस्टाॅप मेट्रो ओव्हर ब्रीज उंची १७ फुट

 

कर्वे रस्ता सेवा रस्त्यालगतची रुंदी १५ फुट