पुणे: मोक्कातील फरार रविंद्र बऱ्हाटेच्या पत्नीसह दोघांना अटक; फसवणूकीच्या कटात सहभागी असल्याचा ठपका

पुणे, ३० जून २०२१: – फसवणूक आणि जमीन बळकाविण्याच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून मोक्कातील फरार आरोपी रविंद्र बऱ्हाटे याच्या पत्नीसह दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संगीता रविंद्र बऱ्हाटे (वय ५५ ) आणि पितांबर गुलाब धिवार अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली आहे.

शहरातील विविध नागरिकांकडे खंडणी मागणे, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या १२ गुन्हयांमध्ये बऱ्हाटे फरार आहे. त्याच्यासह तथाकथीत पत्रकार देवेद्र जैनही फरार आहे. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये बऱ्हाटेविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या टोळीमध्ये सांगलीचे संजय भोकरे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांचाही समावेश आहे. मागील वर्षभरापासून बऱ्हाटे पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याने फेसबुकवर दोन वेळा व्हिडीओ प्रसारित करुन पोलिसांवर आरोप केले होते. संंबंधित व्हिडिओ व्हायरल करण्यास मदत करणाऱ्या पितांबरलाही पोलिसांनी अटक केली आहे. बऱ्हाटेने केलेल्या गुन्हयांमध्ये त्याच्या कुटूंबातील कोणाचा सहभाग आहे का ? याची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात पत्नीचाही कटामध्ये सहभाग असल्याचे दिसत होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास संगीता बऱ्हाटेला ताब्यात घेऊन अटक केले.