पुणे: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी


पुणे, २० जुलै २०२१: – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. ही घटना २ जुलैला घडली होती. अमितकुमार सुरज पाल (वय २१, रा. भिलारीमाऊ, उत्तरप्रदेश ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.


भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर तरूणाने अत्याचार केल्यानंतर तो मूळगावी उत्तर प्रदेशात पळून गेला होता. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्याकडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी आरोपी उत्तरप्रदेशात मूळगावी असल्याची माहिती पोलीस अमंलदार प्रणव संकपाळ आणि शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने उत्तर प्रदेशातील भिलारीमाऊ गावात जाऊन आरोपी अमितकुमारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, एपीआय वैभव पवार, गणेश सुतार, प्रणव संकपाळ, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर यांनी केली.