पुणे: जेष्ठ महिलेची चार कोटींची फसवणूक; नायझेरीयन टोळीला दिल्लीतून अटक

पुणे, दि. १५ जुलै २०२१ – गिफ्टच्या आमिषाने जेष्ठ महिलेची तब्बल ४ कोटीची फसवणूक करणाऱ्या नायजेरीयन टोळीला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केले. त्यांच्याकडून २३ मोबाईल हॅण्डसेट,४ लॅपटॉप, १ हार्ड डिस्क, ५ डोंगल, ३ पेन ड्राईव्ह, ८ मोबाईल सिम कार्डस, ३ डेबिट कार्डस, आयडी कार्ड व कागदपत्रे जप्त करण्यात आली. जांगो निकोलस (वय २९), मंडे ओएके (वय २६), पॉलिनस एमबीआँगो (वय २९,रा.सर्व दिल्ली, मुळ लागोस,नायजेरीया) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. सायबर पोलिसांचे पथक मागील दोन आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून होते.


फिर्यादी महिलेची फेसबुकच्या माध्यमातून आरोपींशी ओळख निर्माण झाली होती. त्यांनी इंटरनॅशनल फोन कॉलद्वारे संपर्क करुन एक महागडे गिफ्ट पाठवले असल्याची बतावणी केली. संबंधित गिफ्ट दिल्ली एअरपोर्ट येथे अडविले असून पार्सल क्लिअर करणे, अटकेतून सोडविण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणेकरीता पैसे लागणार असल्याचा बहाणा सायबर चोरट्यांनी केला. आरोपींनी महिलेला वेगवेगळया एकुण २५ बँकांमधील ६७ बँक खात्यात ३ कोटी ९८ लाख भरावयास लावले. फसवणुक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपी दिल्ली येथे असल्याचे लक्षात आल्यावर तेथे पथक पाठविण्यात आले. त्यानुसार पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, संगिता माळी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, पोलीस अंमलदार अस्लम आत्तार, संदेश कर्णे, मंगेश नेवसे, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, प्रविणसिंग राजपूत, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, अमोल कदम, संदीप यादव, श्रीकांत कबुले, निलम साबळे, अंकीता राघो, उमा पालवे, पुजा मांदळे यांनी ही करावाई केली.