ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

पुणे, दि. २९ ऑगस्ट २०२२: पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यात, सार्वजनिक जागेत, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश ३१ ऑगस्टपासून ते १० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी कळविले आहे.

 

गणेशोत्सव काळात गणेश मंडळे त्यांच्या स्थापनेच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीमध्ये रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस आदी ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करतात किंवा हवेत सोडतात ज्यामुळे मनुष्याच्या जीवितास तसेच खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे फौजदारी दंडप्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे या बाबींना ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ पर्यंत मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात म्हटले आहे.