पुणे: पोलिसांच्या सीसीटीव्हींना खोदकामांचे ग्रहण; दिवसाला ४० ते ५० सीसीटीव्ही होतायेत डिस्कनेक्ट

पुणे, २५ जुलै २०२१: – शहरात महानगरपालिकेकडून विकासकामांसाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जाते. मात्र यामुळे पुणे पोलिसांच्या सीसीटीव्हीचे जाळे तुटत असल्याचे उघडकीस आले आहे. खोदकामामुळे दिवसाला ४० ते ५० सीसीटीव्ही डिस्कनेक्ट होत आहेत. त्यामुळे सीसीटीव्हींद्वारे रेकॉडिंग होत नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थेसह सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


कायदा सुव्यवस्थेसाठी पुणे शहरातील विविध भागात तब्बल १ हजार ३४० सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाते. महापालिकेकडून रस्तेदुरस्ती,पदपथासह बंदिस्त नळपाणीपुरवठा योजनसह विविध कामांसाठी रस्त्याचे खोदकाम केले जाते. या कामांमुळे पुणे शहर पोलिसांचे ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेरे दररोज बंद पडत आहेत. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून तत्काळ कारवाई न केल्यामुळे सीसीटीव्हींद्वारे रेकॉडिंग होत नसल्याचे दिसून आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हींची कनेक्टीविटी महत्वाची आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारासह महापालिकेच्या क्षत्रिय कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात येतो. मात्र, त्याकडे जास्त दिवस कानाडोळा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिसरात एखादा मोठा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हींद्वारे होणारे रेकॉर्डिंग मिळविण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. संंबंधिताविरूद्ध कारवाई करण्याच्या मागणीला जोर धरला आहे.