पुणे: हॉटेल मालक खूनप्रकरणी टोळीविरूद्ध मोक्का

पुणे, ०९/०८/२०२१: व्यावसायिक वादातून उरळी कांचन परिसरातील गारवा हॉटेल मालकाची हत्या केल्याप्रकरणी संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही ४२ वी कारवाई आहे.

बाळासाहेब जयंत खेडेकर वय ५६, निखील बाळासाहेब खेडेकर वय २४, सौरभ उर्प चिम्या वैलास चौधरी वय २१, अक्षय अविनाश दाभाडे वय २७, करण विजय खडसे वय २१, प्रथमेश राजेंद्र कोलते वय २३, गणेश मधुकर माने वय २०, निखील मंगेश चौधरी वय २०, नीलेश मधुकर आरते वय २३, काजल चंद्रकांत कोकणे वय १९ अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संबंधित टोळीने सुपारी घेउन गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर तलवारीने वार करून हत्या केली होती. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे .

संबंधित टोळीविरूद्ध मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, जबरी चोरी, हत्यार बाळगणे असे विविध २१ गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार टोळीविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, गणेश सातपुते, संदीप धनवटे, गणेश भापकर यांनी केली.