पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम

पुणे, २३/०८/२०२१: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातंर्गत सराईत असलेल्या सराईत पप्पू येणपुरे टोळीविरूद्ध मोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोकाचा बडगा कायम ठेवला आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेली ही ४९ वी कारवाई आहे.

प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे (वय २७ आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय २४ रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुर्द), अभिजीत नंदु बोराट (वय ३१ रा. वाघजाई मंदिरामागे, आंबेगाव खुर्द ) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पप्पु येणपुरे टोळील अटक आरोपींवर यापुर्र्वी सन २०१६ पासुन गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे टोळीने दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र, दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले ेआहेत. त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाईसह हद्दपारी करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही परिणाम झालेला नसल्याने त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाईची आवश्यकता होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणीक, एपीआय आशिष कवठेकर एपीआय वैभव गायकवाड कृष्णा बढे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी येणपुरे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी येणपुर टोळी विरूध्द प्रस्तावाला मंजुरी दिली.