September 10, 2025

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पुणे पोलिसांकडून वाहतूक नियोजन; येरवडा-विश्रांतवाडी परिसरात बदल

पुणे, ५ सप्टेंबर २०२५: गणेशोत्सवातील मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आज येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल लागू करण्यात येणार आहेत. तब्बल १०३ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या भागातून पार पडणार असून, नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिरवणुका पुणे-नगर मार्गावरील गुंजन चौक, पर्णकुटी चौक, तारकेश्वर चौक मार्गे चिमा विसर्जन घाट या मार्गाने जाणार आहेत. मिरवणुकीदरम्यान शादल बाबा चौक ते तारकेश्वर चौक या दरम्यान गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येईल.

वाहतूक बदलाचे पर्यायी मार्ग:

शादल बाबा चौकातून तारकेश्वरकडे जाणारी वाहतूक – आंबेडकर चौक–गोल्फ क्लब चौक–शास्त्रीनगर चौक मार्गे नगर रोड

तारकेश्वर चौकातून शादल बाबा चौकाकडे येणारी वाहतूक – पर्णकुटी चौक–गुंजन चौक मार्गे पुढे

वाहतूक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, नियोजित मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, ज्यामुळे मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडतील.