पुणे: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान व्यापाऱ्याकडून ११०५ गोळ्या (काडतुसे) जप्त

मुबारक अन्सारी

पुणे, १२ जून २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्भूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले जात आहे. त्यानुसार, गुन्हेगार, तडीपार, फरार, पाहीजे आरोपी यांचा शोध घेण्यावाबत तसेच बेकायदेशीर शस्त्रे, अग्निशस्त्रे जवळ बाळगणा-या व्यक्तींची माहिती घेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आयुक्तालयातर्फे देण्यात आले आहे.
दरम्यान, या मोहिमेअंतर्गत नुकतेच पुणे पोलिसांनी भंगार मालाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडून सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या ११०५ बंदुकीच्या गोळ्या (काडतुसे) जप्त केल्या.

याप्रकरणी व्यापारी दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (वय – ३४ रा – पर्वती दर्शन , जनता वसाहत पुणे मुळगाव मंगलपुर ता – कुडा , जिल्हा – प्रतापगड, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे ऑल आऊट ऑपरेशनच्या अनुषंगाने हददीत पेट्रोलिंग फिरत असताना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून , गुरुवार पेठ, गौरी आळी, पुणे येथे भंगारमालाचा व्यवसाय करणा-या व्यापा-याने आपले दुकानात बंदुकीची काडतुसे ठेवलेली आहे अशी खबर मिळाली. त्यानंतर पोलीसांनी त्याठिकाणी सापळा लावुन, बातमीची शहानिशा केली. त्यानंतर छापा टाकून भांगाराच्या दुकानातुन ५६ नग जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे, ९७० नग बुलेट (लिड) अशी एकुण ११०५ नग काडतुसे / बुलेट (लिड) असा एकुण १,५६,९०० किमतीचा माल जप्त केला. आरोपी सरोज याला ताब्यात घेऊन, त्याच्या विरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे हत्याराबाबत कायदा कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

आरोपीने एवढया मोठया प्रमाणात काडतुसे व बुलेट कोठुन आणल्या आहेत ? ते कशासाठी जवळ बाळगलेले आहे ? यापुर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे अथवा अग्नीशस्त्रे दिलेली आहेत काय ? याबाबत पोलीस तपास करत आहेत. न्यायालयाने व्यापारी सरोज यास १५ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त (गुन्हे -१) गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – १चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, अय्याज दडडीकर, इम्रान शेख, महेश वामगुडे, तुषार माळवदकर, शुभम देसाई, निलेश साबळे यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड हे करत आहेत.