पुण्यात बनावटी आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे, २१ जानेवारी २०२२: आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलीस दलाच्या स्पेशल सेलचे पोलीस कार्यरत आहेत. नुकतेच या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील बी टी कवडे रस्ता येथील दुकानात बनावटी आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजिज युसूफ शेख (रा. स. नं. ५२/१, गजानन हाउसिंग सोसायटी, घोरपडी गाव, पुणे)

याला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.टी. कवडे रस्ता येथील स्काय स्टार मल्टी सर्विसेस, शॉप नं. ७, वनराज कॉर्नन बिल्डिंग येथे आरोपी अजिज आणि त्याची सहकारी जोरणा हसिम शेख (वय ३४, रा. गुरुवार पेठ, सिंहगड रोड, पुणे) हे खोटी कागदपत्रे व खोटी आधार कार्ड बनवित असल्याची माहिती

पोलिसांना मिळाली होती. ही बातमी मिळताच 19 जानेवारी रोजी स्पेशल सेलच्या तुकडीने दोन पंचांसमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे जोरना शेख व अजित शेख हे दोघे जण सापडले. दुकानाची तपासणी करण्यात आली, असता त्याठिकाणी विनाधिकार शासन निर्धारित फॉर्म, वेगवेगळ्या व्यक्तींची माहिती असलेली कागदपत्रे, पुणे महापालिकेच्या नगरसेवकांच्या नावाचा आडवा व सभासद पुणे मनपा. असा उल्लेख असलेला गोल शिक्का हस्तगत करण्यात आला. तसेच महापालिका सभासदासचे दोन्ही शिक्के व त्यावर इंग्रजीमध्ये स्वाक्षरी असलेले फॉर्मही सापडले. त्याच बरोबर इतर व्यक्तींचे आधारकार्ड काढण्यासाठी भरलेले अर्धवट फॉर्मही मिळाले.

आरोपी अजित शेख याने जोरना शेख हिच्या मदतीने अवैध कोणत्याही प्रकारचा रहिवासी पुरावा नसलेल्या लोकांचेही शासनाने निर्धारित केलेल्या फॉर्मवर इतर कोणताही पत्ता टाकून फॉर्म भरून आधार कार्ड काढून दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी अजित याला अटक केली असून, त्याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ या सर्व कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके,स्पेशल सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक वासंती जाधव, पोलीस उप-निरीक्षक अब्दुल करीम सैय्यद, सहायक पोलीस फौजदार अनिल घाडगे, ईस्माईल शेख, सुधीर देशमुख, विजय भोसले, पोलीस हवालदार, भरत रणसिंग, प्रमोद घाडगे, महिला पोलीस नाईक, शुभांगी तारु, चालक पोलिस हवालदार राजु धेंडे यांच्या टीमने केली आहे.

या गुन्हयाचा पुढील तपास मुंढवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत माने करीत आहेत.