पुणे, दि.२५ मे २०२१: पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी जनरल ट्रान्सफर पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) या अॅपचा वापर करण्यात येणार आहे. पदनिहाय व कामानिहाय बदल्यांच्या नोंदी होणार असल्यामुळे कामातील अडचणी दूर होणार असून, याद्वारे सर्वसाधारण कालावधी पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात पारदर्शकता येईल,असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
पोलीस ठाण्यात कार्यकाळ पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी नियमीतपणे बदल्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासह पोलिस ठाण्यांना योग्य कर्मचारी मिळावे, यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या टीमने हे अॅप बनवून घेतले आहे. नियमित बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती झोनकडून आल्यानंतर त्याचा डेटा अॅपमध्ये नोंदविण्यात येणार. त्यामध्ये बदलीसाठी पात्र असेलल्या पोलिसांनी पूर्वी कोणत्या पोलिस ठाणे, झोनमध्ये किती काम केले आहे. त्याचे पद, तो नेमके कोणते काम करतो, याची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. दरम्यान, यावर्षी कार्यकाळ पूर्ण केलेल्या १ हजार ३०० पोलिसांच्या नियमित बदल्या केल्या जाणार आहेत. त्याशिवाय साडेसातशे पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे.
या प्रणालीमुळे बदली प्रक्रिया स्वयंचलित होणार असून त्यामधील मानवी हस्तक्षेप टाळण्यास मदतहोणार आहे. अॅप प्रणालीद्वारे तक्रारींचे प्रमाण कमी होणार असून पारदर्शकता निर्माण होण्यास तसेच जलद गतीने काम होण्यास हे अॅप उपयुक्त ठरणार आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार