पुणे: धानोरीतील पोरवाल रस्त्याला पर्याय मार्ग मिळणार, आमदार व अधिकार्यांनी केली पाहणी

पुणे, २१ सप्टेंबर २०२२: धानोरी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम आवश्यक असल्याने महापालिकेतर्फे या कामाला गती देण्यात आलेली आहे यासाठी आमदार सुनील टिंगरे व महापालिकेच्या अधिकार्यांनी धानोरी जकात नाका ते मारथोपोलीस शाळेपर्यंतची पाहणी केली. या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली शाळेची जागा महापालिकेला लवकरात लवकर ताब्यात द्यावी यासंदर्भात शाळेला पत्र पाठविण्यात आलेले आहे.
पुण्यामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. पण रस्त्याची रुंदी वाढत नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धानोरी जकात नाका ते मारथोपोलीस शाळे पर्यंतचा रस्ता मोठे होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या समवेत पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची पाहणी करण्यात आली. धानोरी जकातनाका ते मारथोपोलिस शाळा पर्यंतचे काम पूर्णत्वास असून मारथोपोलिस शाळेच्या जागेच्या हस्तांतरीत संबंधीचे पत्र पुणे महानगरपालिका मालमत्ता व्यवस्थापन कडून मारथोपोलिस शाळेला देण्यात आले आहे. या संदर्भात पुढील मंगळवारी दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या दालणात बैठक बोलविण्यात आली आहे. यानंतर पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार,पथ विभागाचे मुख्य अभियंता वी जी कुलकर्णी, डाॅ. राजेशजी साठे, संदिप लोखंडे, वरुणजी सिंह व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार सुनील टिंगरे म्हणाले, धानोरी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोरवाल रस्त्याला पर्यायी रस्ता तयार होणे आवश्यक आहे. यासाठी जकात नाका ते मारथोपोलीस शाळेपर्यंत चा रस्ता रुंदीकरण केला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शाळेला जागा हस्तांतरणासाठी पत्र दिले आहे. त्यांना नुकसान भरपाई देऊन ही जागा ताब्यात घेतली जाईल त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल.