पुणे,७ जुलै २०२१ : दिवसेंदिवस वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक मनस्ताप होत आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला सार्वजनिक वाहतूकीसह इलेक्ट्रिकल वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने मुख्यालयाजवळील पाषाण आणि बाणेर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, डॉ. मिलींद मोहिते, बीपीसीएलचे पी. एस. रवी उपस्थित होते.
पवार म्हणाले,” पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोलपंपामुळे नागरिकांना विश्वासार्हता मिळणाार आहे. त्यामुळे पोलीस कल्याण निधीत वाढ होण्यास मदत होईल. इंधनामध्ये भेसळ होऊ नये ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा पुर्ण करण्यास पोलिसांनी उभारलेले पेट्रोलपंप सक्षम ठरेल असा माझा विश्वास आहे. त्याशिवाय इंधनाच्या गुणवत्तेबाबत कोणतेही तक्रार येणार नाही, याबाबत पोलिसांनी लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान इंधन वाहतूक करणार्या टँकरला जीपीएस प्रणालीचा वापर होत असल्यामुळे भेसळीचेे प्रमाण कमी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने उभारण्यात आलेल्या दोन पेट्रोलपंपामुळे पोलीस कल्याणनिधीत दर महिन्याला 15 ते 16 लाखांचा लाभ होणार आहे. त्याचा वापर विविध कल्याणकारी योजनांसाठी करण्यात येणार आहे.पंप उभारण्यासाठी पोलीस प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार बीपीसीएल कंपनीच्यावतीने पेट्रोलपंप उभारणी केली आहे. भविष्यात परिसरात सीएनजी गॅस पंपासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 39 कोटींची दंडवसूली
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विनाकारण भटकंती करणार्याविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत 39 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जनतेने नियम पाळल्यास कारवाई टाळता येऊ शकते. मात्र, नाईलाजाने कारवाई करावी लागत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात