December 7, 2025

Pune: शिवणे–खराडी रस्त्याच्या रखडलेल्या कामावर श्वेतपत्रिका जाहीर करा : खर्डेकर यांची मागणी

पुणे,३ डिसेंबर २०२५: शिवणे ते खराडी हा महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प बारा–तेरा वर्षांपासून रखडला असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता अक्षरशः बासनात गुंडाळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामाची संपूर्ण श्वेतपत्रिका तात्काळ जाहीर करून प्रकल्पाची सद्यस्थिती आणि पूर्णत्वाची शक्यता स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानचे दोन किलोमीटर अंतरही अद्याप समस्याग्रस्त असून महालक्ष्मी लॉन्सजवळ काम ठप्प झाले आहे. या विभागातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रस्त्याचे अपूर्ण दुभाजक, बेकायदा पथारीवाल्यांची वाढ आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आजही जैसे थे असल्याचे खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

२०१३ साली या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बारा वर्षांनंतरही कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्य समस्या पुढीलप्रमाणे:

राजाराम पुलावरून येणारी वाहतूक विठ्ठल मंदिर चौकात मोठी कोंडी निर्माण करते; तातडीने उपाययोजना गरजेची.

‘हॉटेल आमची’ ते नवसह्याद्री चौक (पंडित फार्मसमोर) या भागात दुभाजक नसल्याने वाहनांची बेफाम वाहतूक आणि रोजचे अपघात.

संध्याकाळी गर्दीच्या वेळी अनेक ठिकाणी पथारीवाल्यांमुळे रस्त्यावर अडथळे निर्माण होतात.

ज्ञानदा शाळा, शुभारंभ लॉन्स, घरकुल लॉन्स परिसरात दुभाजकातील ओपनिंग Blind Turn वर असल्याने पादचाऱ्यांचा जीव धोक्यात.

पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंग तयार करणे, वेग नियंत्रित करणे आणि बेकायदा पथारीवाल्यांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करून रखडलेला प्रकल्प मार्गी लावावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.