October 8, 2025

Pune: 40 टन वस्तू पुनर्वापरासाठी पाठवत पुणेकरांची स्वच्छ व्ही कलेक्ट सोबत दिवाळी आवराआवर सुरू

पुणे, ०७/१०/२०२५: दसरा ते दिवाळी दरम्यान घरातील जुने सामान आवरून स्वच्छता करण्याच्या सवयीला पुनर्वापराची जोड देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या साथीने स्वच्छ प्लस 18 ऑक्टोबरपर्यंत शहरभरात पुनर्वापरासाठी व्ही कलेक्ट मोहिमांचे आयोजन करत आहे. या ‘स्वच्छ व्ही कलेक्ट दिवाळी आवराआवर’ उपक्रमाची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. यामध्ये 23 टन कपडे, 1.8 टन पादत्राणे, 2 टन पुस्तके, 1.9 टन खेळणी यासोबत भांडी, शोभेच्या वस्तू, क्रॉकरी, फर्निचर यांसारख्या पुनर्वापर योग्य जवळपास ४० टन वस्तू गोळा करण्यात आल्या. त्याचबरोबर जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोन, लॅपटॉप इ. सारखा 2.4 टन ई-कचरा देखील गोळा करण्यात आला.

दोनच दिवसात एवढ्या वस्तू पुनर्वापरासाठी पाठवून नागरिकांनी ‘स्वच्छ’ सोबतचे विश्वासाचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. तसेच, शहराची पुनर्वापर व पुनर्निर्मिती प्रत्यक्षात आणण्याची संस्कृती यावर्षी देखील वृद्धिंगत केली आहे. 18 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या मोहीमा नागरिकांच्या सोयीसाठी दर शनिवारी-रविवारी, त्यांच्याच जवळच्या भागात आयोजित केल्या जाणार आहेत. 4 व 5 ऑक्टोबर रोजी पुण्यातील विविध भागातील 170 हून अधिक रहिवासी सोसायट्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. तसेच, 11 व 12 ऑक्टोबर रोजी 100 हून अधिक रहिवासी सोसायटी आणि नागरस रोड औंध, सहकार सदन प्रभात रोड, आनंद निकेतन बॅडमिंटन हॉल कोथरूड यासारख्या सार्वजनिक ठिकाणी देखील व्ही कलेक्ट मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या मोहिमांमध्ये नागरिक आपल्याकडील पुनर्वापर योग्य गोष्टी जसे की कपडे, पादत्राणे, भांडी, खेळणी, पुस्तके, शोभेच्या वस्तू, काचेची भांडी सारख्या अशा गोष्टी पुनर्वापरासाठी देऊ शकतात. तसेच ई कचरा देखील अधिकृत रित्या रिसायकलिंगला पाठवण्यासाठी देऊ शकतात.

आपल्याकडील जुन्या वस्तूंना कचऱ्यात टाकण्याऐवजी पुनर्वापराकडे वळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या वस्तू नागरिकांना उपयोगी नसतील परंतु पुन्हा वापरता येण्यासारख्या असतील तर त्या कचऱ्यात येऊ न देता त्यांना पुनर्वापराच्या माध्यमातून नवीन साथी मिळावा यासाठी गेल्या 10 हून अधिक वर्षांपासून स्वच्छ व्ही कलेक्ट हा उपक्रम सुरू आहे. पुण्यात पुनर्वापराची संस्कृती रुजावी हा या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. गोळा केलेल्या वस्तूंचे योग्य वर्गीकरण करून त्या कचरावेचक किंवा इतर गरजू व्यक्तींसाठी अगदी अल्पदरात उपलब्ध केल्या जातात. पुनर्वापराचे मूल्य जपले जावे, उपक्रम आत्मनिर्भर राहावा यासाठी वस्तूंची अतिशय कमी किमतीत विक्री केली जाते. प्रशासकीय खर्च वजा करून उरलेली रक्कम कचरावेचकांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरली जाते.

पुनर्वापराची सवय शहराच्या शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी व पर्यावरणासाठी मोलाची आहे, त्यामुळे नागरिकांनी व्ही कलेक्ट दिवाळी आवरा आवर मोहिमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन स्वच्छ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

आपल्या जवळील मोहिमांची माहिती https://swachcoop.com/initiatives/v-collect/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच स्वच्छ संस्थेच्या पुण्यातील प्रत्येक भागासाठीच्या व्हॉट्सअप ग्रुप्स वर देखील याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. व्हॉट्सऍप ग्रुपला जोडले जाण्यासाठी 9765999500 या स्वच्छ च्या हेल्पलाईन ला नागरिक संपर्क करू शकतात.