पुणे रेल्वे विभागाकडून अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

पुणे, २९/०१/२०२२: रेल्वेने केवळ आपत्कालीन वापरासाठीच रेल्वेगाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) चा पर्याय दिला आहे. अलीकडे असे आढळून आले आहे की स्टेशनवर प्रवासी उशीरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर उतरणे/बोर्डिंग इत्यादी किरकोळ कारणांसाठी एसीपीचा गैरवापर करत आहेत.

ट्रेनमधील एसीपीचा वापर फक्त त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम करत नाही तर मागे धावणाऱ्या इतर गाड्यांवरही त्याचा परिणाम होतो. एसीपीच्या गैरवापरामुळे गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे त्यांच्या समय पालनात अडथळा निर्माण होतो. एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर झाल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

अशा अनुचित एसीपी घटनांवर पुणे रेल्वे विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. प्रवाशांनी अलार्म चेन अनावश्यक ओढू नये याकरिता सतत उद्घोषणा तसेच रेल्वे गाड्यांमध्ये सूचना बोर्ड लावून दुरुपयोग थांबवण्यासाठी सावध केले जाते. जानेवारी ते डिसेंबर 2021 या एक वर्षाच्या कालावधीत पुणे रेल्वे विभागात अनुचित एसीपीचे 929 मामले दाखल करण्यात आले असून 803जणांना अटक करण्यात आली असून अशा लोकांकडून एक लाख 41 हजार रुपयांहून अधिक दंड करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांना क्षुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुल चा गैरवापर टाळण्याचे आवाहन करीत आहे. यामुळे विनाकारण इतर प्रवाशांची गैरसोय होते. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुल चा वापर करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे.