September 21, 2025

पुणे: वडगावशेरीतील पूरग्रस्त घरांचे पुनर्वसन करा – आमदार बापूसाहेब पठारे यांची विधानसभेत मागणी

मुंबई, ८ जुलै २०२५: वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा, विश्रांतवाडी व कळस परिसरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुरस्थितीचा प्रश्न गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून कायम असून, या समस्येवर आता ठोस व कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले.

आपल्या भाषणात आमदार पठारे म्हणाले, “दरवर्षी या भागांमध्ये पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरते. सुमारे ६५० घरे दरवर्षी पुराच्या धोक्याखाली राहत असून, त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत होते. ही समस्या केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी सुटणारी नाही. त्यामुळे पूरग्रस्त घरांचे पुनर्वसन सुरक्षित स्थळी करणे अत्यंत गरजेचे आहे.”

या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली की, वडगावशेरी मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यात पूरनियंत्रण व पुनर्वसन उपाययोजनांचाही समावेश आहे. यापैकी ७० कोटी रुपये निधी दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाला आहे. पुनर्वसनाबाबतही शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याच वेळी आमदार पठारे यांनी खराडी येथील सर्व्हे क्र. ५३ व ५४ मधील एक्झिबिशन ग्राउंड म्हणून आरक्षित असलेल्या जागेचा मुद्दाही सभागृहात उपस्थित केला. त्यांनी सवाल केला की, “ज्या जमिनीची मालकी पुणे महानगरपालिकेकडे असून ७/१२ उताऱ्यावरही महापालिकेचे नाव आहे, ती जागा एका खासगी उद्योजकाच्या नावावर कशी जाऊ शकते? जर उद्योजकाला आरक्षित जागा दिली जाऊ शकते, तर मग सामान्य शेतकऱ्यांनाही आरक्षणातून मुक्ती मिळेल का?” या प्रश्नावर मंत्री सामंत यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.