December 23, 2025

Pune: भारत मंडपम उभारणीसाठी आरक्षण बदलाचा घाट, माहिती सार्वजनिक न करण्याचे प्रयत्न

पुणे, २२ डिसेंबर २०२५ : महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) लोहगाव येथे प्रस्तावित करण्यात आलेली वाहनतळ, रुग्णालय, उद्यान, रस्ते यासह विविध नागरी सुविधांची आरक्षणे रद्द करुन तेथे दिल्लीच्या धर्तीवर ‘भारत मंडपम’ उभारण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. भाजप आमदाराच्या पत्राचा आधार घेत या भागतील महत्वाची आरक्षणे काढून तेथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे महापालिकेने संकेतस्थ‌ळावर टाकावीत. तसेच या आरक्षण बदलांवर नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविता याव्यात, यासाठी एक महिना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक खरवडकर आणि पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोहगाव भागातील ३० एकर जागा ‘भारत मंडपम’ या प्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही जागा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात या परिसरात असलेली आरक्षणे रद्द केली जाणार आहेत. यामध्ये रस्ते, उद्याने, रुग्णालय यासह वाहनतळांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागांचा समावेश आहे. ही आरक्षणे उठविल्यानंतर या भागातील नागरिकांना या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे. ही आरक्षणे उठविल्यानंतर या भागातील रस्ते रुंद करण्यास मोठी अडचण निर्माण होणार असून येथे वाहतूक कोंडी वाढणार आहे, असा दावा वेलणकर यांनी केला आहे.

लोहगाव परिसरातील आरक्षणे बदलण्याची माहिती स्थानिक आमदारांसह इतर नागरिकांना देखील नाही. प्रशासन देखील याची माहिती देत नाही. गोपनीय पद्धतीने आरक्षण बदलण्याचा प्रकार सुरु असल्याचे यावरुन दिसते. माहिती लपवून महापालिकेला काय फायदा मिळणार आहे? हा प्रश्न पडतो. याला आमचा विरोध नाही, पण ही आरक्षणे बदलल्याने काय परिणाम होणार आहे, हे स्थानिकांना समजले पाहिजे – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

लोहगाव भागातील आरक्षणे उठविण्यासाठी गेल्या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात महापालिकेने जाहीर प्रकटन दिले असून त्यामध्ये येथे ‘भारत मंडपम’ प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. हा प्रकल्प नक्की काय आहे? त्यामध्ये नक्की काय होणार? हा प्रकल्प कोणी प्रस्तावित केला, त्यासाठी लागणारा निधी कोण उपलब्ध करुन देणार, आरक्षणे रद्द केल्याने काय होणार? याची कोणतीही सविस्तर माहिती महापालिका प्रशासन देण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांनाही त्यावर हरकती आणि सूचना नोंदविता येत नाही. या भागातील नागरिकांनाही भारत मंडपम प्रकल्पासाठी आरक्षणे उठविली जात असल्याची कोणतीही माहिती नाही.

या प्रकल्पावर नागरिकांच्या हरकती सूचना आल्यास आणि नागरिकांना हे आरक्षण रद्द होऊन येथे प्रकल्प होणे आवश्यक वाटल्यास खऱ्या अर्थाने हा प्रकल्प उभा राहू शकतो. मात्र या प्रकल्पाची कोणतीही सविस्तर माहिती नागरिकांसमोर जाहीर न करता माहिती लपविण्याचा प्रकार महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला. शहरातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने लोहगाव येथे भारत मंडपम प्रकल्प करण्याची विनंती पत्राद्वारो महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने आरक्षणे रद्द करुन तेथे हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. संबधित आमदाराने ही जागा निश्चित का केली? लोहगाव परिसर या आमदारांच्या कार्यक्षेत्रात येतो का? मग प्रशासनाने इतर लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली का? याची कोणतीही माहिती प्रशासनातील अधिकारी देत नसल्याची तक्रार वेलणकर यांनी केली.

यासंदर्भातील सर्व कागदपत्रे नागरीकांसाठी अभ्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावीत. यामध्ये कोणाची पत्रे आहेत. राज्य सरकारने काय आदेश दिले आहेत. त्यावर महापालिकेने काय भूमिका घेतली. राज्य सरकारने नक्की काय सांगितले आहे. याची सर्व कागदपत्रे नागरिकांसमोर सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यावर हरकती सूचना घेणे आवश्यक आहे. कोणतीही माहिती न देता महापालिका हरकती, सूचना घेत असेल तर ते अन्यायकारक आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावीत, तसेच नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.