पुणे, ८ सप्टेंबर २०२५: शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी पुणेकरांनी यंदाही मुळा-मुठेला संजीवनी दिली आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात यावर्षी १० दिवसांमध्ये तब्बल ६ लाख ५० हजार ४२१ गणेशमूर्तीचे विसर्जन महापालिकेकडून
उपलब्ध करून दिलेले हौद आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये करण्यात आले. मागील वर्षांच्या तुलनेत विसर्जित मूर्तीची संख्या तब्बल एक लाखांनी वाढली आहे. २०२४ मध्ये शहरात ५ लाख ५९ हजार ९९२ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले होते. तर यंदा तब्बल ८७६ टन निर्माल्याचे संकलनही करण्यात आल्याची माहिती महापालिकेडून देण्यात आली.
मूर्तीदानाची टक्केवारी घटली
महापालिकेकडून मागील वर्षां प्रमाणेच यंदाही नागरिकांना गणेशमूर्ती दान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र, यावर्षी मूर्तीदानाची संख्या घटली आहे. यावर्षी शहरात एकूण विसर्जित मूर्ती पैकी १ लाख ७८ हजार ३७६ (२७ टक्के) मूर्तीचे दान झाले आहे. तर, २०२५ मध्ये हा आकडा १ लाख ७६ हजार ६७ (३७ टक्के) होता, त्यामुळे यंदा मूर्तीदानात १० टक्के घट झाल्याचे समोर आले.
महापालिकेच्या प्रयत्नांना यश
न्यायालयाकडून यावर्षी पीओपीच्या गणेशमूर्तीला परवानगी दिली असली तरी महापालिकेकडून पाच फूटांपेक्षा कमी आकाराच्या मूर्तीसाठी दरवर्षी प्रमाणे कृत्रीम हौद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेकडून यंदा विसर्जनासाठी नदीकाठचे बांधकाम केलेले विसर्जन ३८ हौद सज्ज ठेवले होते. तर शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विसर्जनासाठी २८१ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर, ६४८ ठिकाणी लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. या शिवाय, पर्यावरणपूक गणेशोत्सवासाठी २४१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून देण्यासह ३२८ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते. तर, निर्माल्य संकलनाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेत स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेतला होता.
शेतकऱ्यांना निर्माल्याचे खत…
यावर्षी महापालिकेकडून निर्माल्य संकलनाची सुविधा वाढविल्याने तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने तब्बल ८७६ टन निर्माल्य संकलन झाले आहे. २०२४ मध्ये ७०६ टन तर २०२३ मध्ये ६५० टन निर्माल्याचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत महापालिकेकडून यावर्षी समाविष्ट गावातही निर्माल्य संकलनावर ‘भर दिल्याने हे निर्माल्य नदीत जाण्यापासून वाचले आहे. तर, या निर्माल्यापासून महापालिका खत तयार करणार असून ते शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर
शासकीय विभागांचा महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये खोडा आयुक्त करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार