पुणे: नाट्यगृह, चित्रपट गृह, महोत्सवांवर बंधने कायम

पुणे, २९/११/२०२१: शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता एक डिसेंबरपासून १०० टक्के सुरू होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश आज (सोमवारी) काढले आहेत.

पालकमंत्री पवार यांनी शनिवारच्या (ता. २७) बैठकीमध्ये मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये ५० टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी ४८ तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.

या ठिकाणी असणार ५० टक्के उपस्थितीचे बंधन
चित्रपट गृह, नाट्य गृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी देता येईल. त्यामुळे २ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे.

खुल्या जागेसाठी २५ टक्के उपस्थिती
संपूर्ण खुल्या जागेत (ओपन टू स्काय) कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांच्या उपस्थितीतच परवानगी दिली जाईल. अशा ठिकाणच्या क्षमतेची आधीच निश्‍चीती केली नसेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास क्षमता ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी १ हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील तर त्याची प्राधिकरणास माहिती द्यावी लागेल. तेथे प्राधिरणातर्फे परिक्षक म्हणून प्रतिनधी पाठवला जाईल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कार्यक्रम पूर्ण किंवा अशतः रद्द केला जाऊ शकतो असे आदेशात नमूद केले आहे. यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शताब्दी वर्ष असल्याने सवाई गंधर्व महोत्सवाला विशेष महत्व होते. पण आता हा कार्यक्रम २५ टक्के उपस्थितीमध्ये घ्यावा लागणार आहे.