पुणे: रिक्षा चोरटे गजाआड सहा रिक्षा जप्त

पुणे, १९/११/२०२२: शहराच्या वेगवेगळ्या भागातून रिक्षा लांबविणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. चोरट्यांकडून सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या.

शादाब युसुफ अन्सारी (वय २१), अकील हमीद चौधरी (वय ३८, दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खडकी, दत्तवाडी, कात्रज, कोंढवा भागातून तीन आसनी रिक्षा चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून तपास करण्यात येत होता. रिक्षा चोरटे ओैंध परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.

दोघांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून सहा रिक्षा लांबविल्याची माहिती तपासात उघड झाली. चोरट्यांकडून सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. दोघांना खडकी न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षीरसागर, रामदास गोणते आदींनी ही कारवाई केली.