Right Step Wellness and Rehab Foundation

पुणे: राईट स्टेप फाउंडेशन ठरत आहे व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना एक नवसंजीवनी!

पुणे, ८ ऑगस्ट २०२२:   व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांना एक नवे जीवन बहाल करण्याऱ्या राईट स्टेप वेलनेस अँड रिहॅब फाउंडेशनतर्फे नुकतेच यशस्वी व्यसनमुक्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
एन. डी.ए गेट,कोंढवे धावडे परिसरातील हे फाऊंडेशन  गेल्या पाच वर्षांपासून व्यसन मुक्तीसाठी कार्यरत आहे.
संस्थेतर्फे नुकतेच आयोजित सन्मान सोहळ्यासाठी आमदार भीमराव तापकीर, सरपंच सुभाष नाणेकर, व्यसनमुक्तीतज्ञ डॉ. चंद्रशेखर हळीगळे व डॉ. प्रकाश वायकर तसेच उद्योजक तुकाराम इंगळे,युवा नेते प्रसाद कोंडे,नरेंद्र मरळ,उमेश सरपाटील,किरण बारटक्के, सुरेश धावडे,प्रसाद ओक,प्रकाश साळवे  उपस्थित होते.
अनेक अनाथ व्यसनाधीन तरुणांना व्यसनमुक्त करून त्यांचे पालकत्व स्वीकारणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै.सचिन साळवे यांचे या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
पै. साळवे यांनी कुस्तीकडून व्यसनमुक्तीकडे सुरू केलेले हे कार्य अत्यन्त उल्लेखनीय असून या भागातील हे आदर्शवत सामाजिक कार्य आहे, असे गौरवोउदगार आमदार तापकीर यांनी काढले. रुग्णांच्या सेवेसाठी या संस्थेला एक रुग्णवाहिका लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असेही ते पुढे म्हणाले.
या फाउंडेशनला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन स्थानिक नेते सुभाष नाणेकर यांनी दिले. डॉ.चंद्रशेखर हळीगळे व डॉ. प्रकाश वायकर यांनी उपस्थित रुग्णांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले. समुपदेशक अभिजित देशमुख यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालनाची धुरा निवेदक मदन धायरे यांनी सांभाळली, तर सुकेशनी सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.