पुणे: मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीत दरोडा, प्रकरणात आणखी दोघे अटकेत

पुणे, १९/११/२०२२: मार्केट यार्ड भागात एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार रोकड लुटणाऱ्या चोरट्यांच्या साथीदारांना गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संतोष बाळू पवार (वय २३), साई राजेंद्र कुंभार (वय १९, रा. पानशेत रस्ता, खानापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करुन चोरट्यांनी २७ लाख रुपयांची रोकड लुटली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने चोरट्यांना पकडले. त्यानंतर चोरट्यांचे साथीदार पवार आणि कुंभार यांचा शोध घेण्यात येत होता. पवार आणि कुंभार यांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल एका अल्पवयीन मुलाकडे ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांच्या पथकाने पवार, कुंभार यांना सापळा लावून पकडले. चौकशीत गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल अल्पवयीन मुलाकडे दिल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षीरसागर, रामदास गाेणते, शरद वाकसे, किरण पवार आदींनी ही कारवाई केली.