पुणे: लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार – संभाजीराजे

पुणे,२९ मे २०२१: मराठा आरक्षण विषयासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि खासदार यांच्यासोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे,अशी माहिती खासदार संभाजी राजे यांनी शनिवारी (दि.29) पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संभाजीराजे यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाला शांतता पाळण्याचं आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरा करत, विविध राजकीय नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहे. संभाजीराजे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले,” मला शाहू महाराजांचा आणि प्रकाश आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर आज मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो आहे. आता राज्यातील मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि खासदार यांच्यासोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे,” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” शरद पवार यांचं राजकारण मी ४० वर्षापासून जवळून पाहत आलोय. ते नरोबा आणि कुंजरोबाच्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतील. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली.