पुणे: धानोरी, येरवडा भागातील पूर टाळण्यासाठी होणार ५५ कोटीचा खर्च

पुणे, ११/१०/२०२१: शहरातील धानोरी, येरवडा, कल्याणीनगर या भागातील स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईनची तातडीची 55 कोटींची कामे आता महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहेत. या भागाला शनिवारी पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

शनिवारी सायंकाळी धानोरी, लोहगाव, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या पुराच्या पाणी सोसायट्या आणि घरांमध्ये शिरण्याचे प्रकार घडले. या भागात स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईनची कामे न झाल्याने या भागातील नागरिकांना हा पुराचा फटका सहन करावा लागला. या पुरानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकित स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजलाईनसाठी अंदाजपत्रकात जी 70 कोटींची तरतुद आहे. त्यामधून पुरग्रस्त भागातील म्हणजे धानोरी, कल्यानीनगर, विमाननगर तसेच हडपसर भागातील स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजची 55 कामे कोटींची कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवून ही कामे सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान धानोरी भागातील स्ट्रॉम वॉटरच्या लाईनच्या कामांसाठी गेल्या स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे यांनी चार वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. उशिरा का होईना ही कामे होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.