पुणे: प्रवासी गाडीची खासगी वाहतूक प्रकारात नोंदणीच्या बहाण्याने आरटीओ एजंट’कडून तरूणाची फसवणूक

पुणे, दि. 16 मे 2021: – प्रवासी गाडीची खासगी वाहतूकीच्या संवर्गात नोंदणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यलयातील (आरटीओ) एंजटने तरूणाला तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. आरटीओतील विविध विभागात काम करणाऱ्यांना पैसे दिल्यानंतरच गाडीची नोंदणी खासगी प्रकारांतर्गत होईल, असे सांगून या एजंटने तरुणाकडून पैसे लाटले. विशाल अर्जुन सोनवणे (रा. थिटे वस्ती, खराडी ) असे आरोपीचे नाव आहे. तर अझिम मिसार इबुशे (वय २८, रा. कोल्हापूर) यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी अझिम मूळचे कोल्हापूरमधील रहिवाशी आहेत. त्यांची मोटार टुरिस्ट प्रकारातील असल्यामुळे त्यांनी विशालची भेट घेऊन गाडीची आरटीओ कार्यालयात खासगी नोंदणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विशालने मोटार प्रायव्हेट करण्यासाठी अझिमला १ लाख २५ हजार आणि वैयक्तिक ५ हजार रूपये असा खर्च सांगितला होता. त्यानुसार मोटारीची खासगी प्रकारात नोंदणी करण्यासाठी अझिमने विशालला एनइएफटी करून तब्बल १ लाख ४७ हजार रूपये पाठवून दिले. मात्र, त्यानंतरही विशालने मोटारीची नोंदणी करून दिली नाही.

त्यामुळे अझिमने त्याला फोन केला असता, मी तुमची रक्कम खर्च केली आहे. लवकरच तुमचे पैसे परत देईल, मी तुमचे काम करू शकत नाही, असे सांगितले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अझिम यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.