महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे आदेश

पुणे, ३१/०८/२०२१: पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिलांसाठी खूशखबर. आता त्यांना १२ तासाऐवजी ८ तासांची ड्यूटी असणार आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.

कर्तव्य करीत असलेल्या महिलांना अनेक वेळा सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा ज्यादा तास कर्तव्य करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होवून त्यांचा त्यांचे दैनंदिन कर्तव्यावर देखिल परिणाम होत असतो.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार यांच्या या अडचणीचा सहानभुतीपुर्षक विचार करून त्यांना आठ तासाची ड्यूटी द्यावी असे आदेश दिले होते. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर पुणे ग्रामीण पोलिस दलाची निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार पुणे ग्रामीण मध्ये आदेशान्वये १ सप्टेंबरपासून पुणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदारांना ८ तासाची ड्यूटी असणार आहेत. देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.

महिला पोलीस अंमलदार यांनी जोरदार स्वागत केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुरूष पोलीस अंमलदार यांना देखिल ८ तासाची ड्यूटी केली जाईल, असे संकेत देशमुख यांनी दिले आहेत.