पुणे: जनावरांच्या दुध वाढीसाठी बेकायदा ऑक्सिटॉसिन औषधाची विक्री, परराज्यातील टोळीचा पर्दाफाश

पुणे, दि. ०६/११/२०२२: गाई, म्हशींच्या दुधवाढीसाठी ऑक्सीटॉसिन औषधाचा साठा करून त्याची विक्री  करणार्‍या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश पुणे गुन्हे शाखेने पर्दापाश  केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एक, विमानतळ पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तीक कारवाई करून ऑक्सीटॉसिन औषधांचा 53 लाख 52 हजारांचा साठा जप्त केला आहे.  कलवडवस्ती परिसरात  कारवाई करण्यात आली.

समीर अन्वर कुरेशी (29, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशु जाना (44, रा. पुरबा बार, इलासपुर, पुरबा मदीनीनपुर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (27, तिराईपुर, पश्चिम बंगाल), सत्यजीत महेशचंद्र मोन्डल (22, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (32, रा. नलपुरकुर, मंडाल, 24 परगाना, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी निरीक्षक सुहास सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

लोहगावमधील कलवड वस्तीवर गाई, म्हशीचे दुध वाढवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधाचा बेकायदेशिर साठा करून ठेवल्याची माहिती  अमंली पदार्थ विरोधी पथक एकचे  अंमलदार पांडुरंग पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून घटनास्थळी छापा टाकला.त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये  ऑक्सिऑसिन व द्रावणाचा साठा करून विक्रीसाठी पॅकिंग सुरू असल्याचे दिसून आले.

उत्तरप्रदेशातील असलेला आरोपी समीर कुरेशी त्याच्या  इतर साथीदाराच्या मदतीने  बेकायदेशिर साठा करीत असल्याचे उघडकीस आले.

मुख्य सुत्रधार कुरेशी हा  औषध गोठा मालकांना पुरवत असल्याचेही दिसून आले. अन्न व औषध प्रशासनातील सहायक आयुक्त दिनेश खिवंसरा, औषध निरीक्षक अतिष सरकाळे, सुहास सावंत, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी औषध पुरवठा झालेल्या गोठ्यांमध्ये जाऊन पाहणी केली. तेथेही हे औषध पुरवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोपींकडून  तब्बल 53 लाख 52 हजारांच्या औषधाचा साठा जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे,  पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, संदिप शिर्के, सचिन माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली