पुणे: आहारस्वास्थ व जीवनशैली शिबीरात पोलिसांना मार्गदर्शन

पुणे, दि. १८ जुलै २०२१: – पोलिसांना
ऑनड्युटी असताना नेमका आहार कसा असला पाहिजे, कोणत्या पदार्थातून शरीराला एनर्जी प्राप्त होउ शकते, मांसाहार कमी करून कडधान्य फळभाज्या खाण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.


सत्व लाईफस्टाईल मॅनेजमेंटच्यावतीने समर्थ पोलिस ठाण्यात आयोजित आहारस्वास्थ आणि जीवनशैली विषयावर डॉ. सोनल पुरोहित यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्यासह विविध अधिकारी कर्मचाऱ्यांसह कुटूंबीय उपस्थित होते.


यावेळी डॉ. पुरोहित म्हणाल्या,” दररोज कामानिमित्त होणाऱ्या धावपळीसह ताणतणाव कमी करण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे. योग्य आहार न घेतल्यामुळे त्यांच्या स्वास्थावर मोठा परिणाम होतो. फास्टफूडसह अवेळी खाण्याच्या प्रकारांमुळे शरीरातील स्थुलपणा वाढत जातो. त्यामुळे पोलिसांनी आहाराबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.”


घरगुती आहारामध्ये तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे. त्यामुळे शरीरावरील दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय दररोज आहार घेण्याची वेळ निश्चीत ठेवणे गरजेचे आहे. मासांहार कमी करून फळभाज्या आणि कडधान्य खाण्यावर भर देणे महत्वाचे आहे. तसेच रोज किमान पाउणतास व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, वयोमानानुसार आहार घेतल्यास स्वास्थ चांगले राहण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.